हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

जनुकीय पुरावे

By- Paresh Chitnis

सर अॅलेक जेफरीज हे ब्रिटिश जनुकीय शास्त्रज्ञ आहेत. जगभरात केल्या जाणार्‍या डीएनए फिंगरप्रिंटींग चाचणीचा शोध त्यांनी लावला. पित्रुत्व चाचणी व स्थलांतरितांचे मूळ शोधायला प्रामुख्याने याचा वापर केला जातो. अॅलेक जेफरीज यांनी आपल्या लॅब मध्ये अपघाताने हा शोध लावला होता. १९८४ मध्ये त्यांनी हातात आले म्हणून सहजच त्यांच्या सहकार्‍याच्या परिवारातील व्यक्तिंच्या डीएनए प्रोफाईलचा अभ्यास केला. एक्सरे फिल्म वर दिसणार्‍या या प्रोफाईल मध्ये त्यांना साम्य तसेच फरक दिसून आले आणि त्यांच्या लक्षात आले की याचा वापर पालकत्व निर्धारित करण्यात होऊ शकतो.

१९८७ मध्ये त्यांनी आपल्या संशोधनाला व्यवसायात रुपांतरीत केले. त्यांनी या चाचणीत लागणारे बरेचसे प्रायमर तयार केले आणि त्याचे पेटंट घेतले. १९८४ मध्ये शोध लावल्या पासून अॅलेक जेफरीज यांनी आपल्या लॅब मध्ये लाखो डीएनए प्रोफाईल तयार केल्या आणि अनेक तपासांमध्ये न्याय सहाय्यक निकाल दिले.

सगळ्यात पहिली डीएनए प्रोफाईलिंगची केस त्यांच्या कडे आली त्यात त्यांना एका स्थलांतरित परिवारातील मुलाचे पालकत्व शोधायचे होते. हा परिवार घाना देशातला होता आणि त्यांच्या एक मुलगा हा त्यांचा नाही आहे असा संशय होता. पण डीएनए चाचणी केल्यावर असे निष्पन्न झाले की तो त्याच परिवारातला आहे.

पहिली पोलिस केस त्यांच्याकडे आली ती म्हणजे नारबरो, लाईसेसटरशायर मध्ये झालेल्या दोन बलात्कार आणि निर्घृण हत्यांची. १९८३ व १९८५ मध्ये लिंडा मान व डॉन अॅशवर्थ या पंधरा वर्षीय मुलींचे खून झाले होते. एकाच जागी तीन वर्षांच्या कालावधीत घडलेल्या या प्रकारांमध्ये खूप साम्य होते. 

१९८५ मध्ये डीएनए प्रोफाईलिंगची शोध लागलेला होता पण त्याचा प्रसार झाला नव्हता. तेव्हा त्यांच्या मृत शरीरात सापडलेल्या वीर्याच्या इतर दोन चाचण्या करण्यात आल्या. असे लक्षात आले की गुन्हेगाराचे ग्रुप ए रक्तगटाचा आहे व फोस्फोग्ल्युकोम्यूटेज १ नावाचे एनझाईम रसायन त्याच्या रक्तात जास्त प्रमाणात आहे. या दोन गोष्टी एकाच व्यक्तीच्या रक्तात सापडणे याची शक्यता दहा टक्के पेक्षा कमी असल्याने या दोन्ही चाचण्यांमध्ये पॉझिटीव्ह सापडणारा संशयितच गुन्हेगार असण्याची शक्यता खूप जास्त होती. 

 दुसर्‍या घटनेनंतर एक सतरा वर्षीय गतिमंद मुलाला अटक करण्यात आली. त्याच्या वडिलांनी डॉक्टर अॅलेक जेफरीज यांच्या डीएनए चाचणी बद्दल वाचले होते. डीएनएचे अस्तित्व दोन दशकांपासून माहिती असूनही त्याचा वापर ओळख पटवण्यासाठी करण्याची चाचणी अस्तित्वात नव्हती. अॅलेक जेफरीज यांच्या लॅब मध्ये चाचणी केल्यावर असे लक्षात आले की तो मुलगा निर्दोष आहे. पण असे निश्चित करता आले की दोन्ही खून एकाच व्यक्तीने केले आहेत. पोलिसांनी आसपासच्या गावातील सर्व तरुणांचे रक्त अॅलेक जेफरीज यांच्या लॅब मध्ये पाठवण्याचे ठरवले. सर्व नागरिकांनी सहकार्य केले. अर्थात गुन्हेगार स्वतःहून रक्त द्यायला येणार नाहीच हे माहिती असल्याने, चाचणीची टाळाटाळ करणार्‍यांची सखोल चौकशी केली जाऊ लागली. एका वर्षात एक हजार गावकरी तरुणांचे रक्त तपासण्यास गोळा करण्यात आले. पण डीएनए चाचणीला लागणार्‍या वेळांमुळे फक्त अडीचशे तपासण्या पूर्ण झाल्या होत्या. 

१ ऑगस्ट १९८७ ला एका बेकरीचे कामगार संध्याकाळी दारू पीत गप्पा मारत बसले होते. त्यांची चर्चा त्यांच्या एका सहकारी कोलीन पीचफोर्क याच्याबद्दल सुरू होती. तो स्त्रियांशी जास्त जवळीक साधतो आणि खूप कामुक आहे असे बोलणे सुरू होते तेवढ्यात एका मित्र, आएन केली, याने असा खुलासा केला की कोलीन पीचफोर्कने त्याला रक्त चाचणीसाठी त्याच्या ऐवजी खोटं ओळखपत्र घेऊन जायला सांगितले होते. बळजबरी करून व थोडे पैसे देऊन त्याने केलीला हे करायला भाग पाडले होते. हा गौप्यस्फोट करताच त्यांच्यात एक भयाण शांतता पसरली. दुसर्‍या एका मित्रानेही नंतर सांगितले की पीचफोर्कने त्यालाही अशी विनंती केली होती. 

काही दिवसातच ही बातमी पोलिसांकडे पोहोचली. पोलिसांनी केलीला ताब्यात घेतले. नंतर कोलीन पीचफोर्कला पकडून त्याची डीएनए चाचणी करून घेतली. त्याचा डीएनए गुन्हेगाराच्या डीएनए प्रोफाईलशी मॅच झाला. 

त्याने गुन्ह्याची कबुली दिली. डीएनए प्रोफाईल वरून गुन्हेगार शोधण्याची आणि एका व्यक्तीला निर्दोष ठरवण्याची ही जगातली पाहिलीच वेळ होती. त्या काळात जगभरातून लोकं डॉक्टर अॅलेक जेफरीज यांच्या लॅब मध्ये सॅम्पल पाठवत होते. जनुकीय चाचणी करण्याची त्याकाळातील ही एकाच लॅब होती. डॉक्टर अॅलेक जेफरीज यांनी त्याकाळात पैशापेक्षा सन्मान जास्ती कमावला. त्यांना ब्रिटनची सर्वोच्च पदवी मिळाली. सर अॅलेक जेफरीज हे डीएनए फिंगरप्रिंटींगचे जनक ठरले. 

जर्मनीचा नाझी डॉक्टर जोसेफ मेंगेल हा लाखो लोकांना गॅस चेंबर मध्ये मारण्यास पाठवणारा क्रूरकर्मा १९८७ साली पाण्यात बुडून मेला होता अशी शंका होती. पाण्यात सापडलेल्या हाडांमधून काढलेल्या डीएनए वरुन त्याची ओळख १९९२ मध्ये पटवण्यात आली. 

अॅलेक जेफरीज इंग्लंड मध्ये डीएनए चाचण्या करत होते त्याच काळात १९८७ मध्ये इंग्लंड मधून संशोधन पूर्ण करून भारतात परतलेले डॉक्टर लालजी सिंग हे भारताचे डीएनए चे जनक म्हणुन ओळखले जातात. लालजी सिंग यांनी मनुष्याचे डीएनए व ईतर प्राण्यांचे डीएनए यावर अभ्यास यापूर्वीच केला होता. 

भारतात सीसीएमबी हैदराबाद येथे त्यांनी डीएनए फिंगरप्रिंटींगचे तंत्रज्ञान तयार केले व गुन्हे अन्वेषण व न्याय सहाय्यासाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. बेअंत सिंघ व राजीव गांधी हत्या; नैना सहानी तंदूर हत्याकांड; स्वामी प्रेमानंद व स्वामी श्रद्धानंद केस; प्रियदर्शिनी मट्टू हत्याकांड या सर्व प्रकरणांमध्ये लालजी सिंग यांनी डीएनए फिंगरप्रिंटींग चाचण्या केल्या होत्या. भारतात डीएनए फिंगरप्रिंटींगला पुरावे म्हणुन मान्यता मिळवून देण्यात त्यांचा एकहाती सहभाग होता. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ़ बायोटेक्नॉलॉजीने १९९५ मध्ये सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटींग अँड डायग्नोस्टीकस् स्थापन केले. व्यक्तींची ओळख प्रस्थापित करण्याचा प्रमुख उद्देश या केंद्राचा आहे. २००४ साली लालजी सिंग यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला व भारतीय डीएनए फिंगरप्रिंटींगचे जनक म्हणुन ते नेहमीच ओळखले जातील. 

CPAG

Popular Posts