हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

एक होता विदुषक

By- Paresh Chitnis

आयुष्यातली पाहिली काही वर्ष व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व ठरवते असे म्हणतात. बालपणी घडलेल्या घटनांचा आयुष्यभर कसा परिणाम होतो आणि चुकीचे पालकत्व झाल्यास मूल गुन्हेगारी प्रवृत्तीचे कसे बनते त्याचे हे उदाहरण. 

जॉन वेन गेसी याचे बालपण अतिशय वाईट होते. त्याला दोन बहिणी होत्या. वडील अतिशय तापट. कुठल्याही कारणावरून गेसी वडिलांचा मार खात असे. येता जाता वडील त्याला मुलींमध्ये राहून मुलींसारखा झाला आहे असे म्हणत. हातात असेल त्या वस्तूने वडील त्याला मारत असत. कित्येक वेळा त्याला डोळ्यांपुढे अंधारी येईपर्यंत वडिलांनी मारले होते. हृदयाच्या तक्रारीमुळे त्याला खेळणे वर्ज्य होते. त्यामुळे तो स्थूल झाला होता. शाळेत त्याला स्थूलपणामुळे मुलं चिडवत असत. बारा वर्षांचा असताना त्याला झटके येऊन तो बेशुद्ध पडू लागला. वडिलांचा मार खाल्ला की त्याला दवाखान्यात अ‍ॅडमिट करावे लागत असे. वडील दवाखान्यात ही त्याची अवहेलना करत असत. त्याने थोडे थोडे करत एक वर्ष दवाखान्यात घालवले पण त्याच्या झटके येण्याचे निदान होऊ शकले नाही. वडील म्हणायचे की तो आजारी असल्याचे खोटं नाटक करतो. तो कामचुकार आहे असे ते त्याला दवाखान्यात येऊन म्हणायचे. त्याच्या शाळेत जाऊन तर कधी घरी आलेल्या मित्रांसमोर वडील त्याला मारायचे. हे असे तो मोठा होईपर्यंत चालूच होते.

गेसी आपल्या वडिलांच्या नजरेत चांगला व्हावा यासाठी खूप धडपड करायचा पण वडील त्याचा अपमान करायचे.

अठरा वर्षाचा झाल्यावर एक दिवस रागाच्या भरात तो घर सोडून निघून गेला. त्याने लास वेगासला दवाखान्यात नौकरी धरली.

तिथे नौकरी करत असताना त्याला शवागारात नेमले गेले. आलेल्या शवांना शवागारात ठेवणे हे त्याचे काम होते. एका तरुण मुलाचे शव एकदा आले होते. गेसी त्या तरुणाच्या शव पेटीत शिरून त्याच्या जवळ झोपला आणि त्या मृत शरीराला स्पर्श करू लागला. त्याला जेव्हा लक्षात आले की तो काय करतोय तो स्वतःच घाबरला. त्याने आईला फोन करून घरी परतण्याची परवानगी मागितली. आईने वडिलांना विचारून त्याला परत बोलावले.

गेसी वेगवेगळ्या नौकऱ्या करु लागला. त्याने बरोबर काम करणार्‍या मर्लीन नावाच्या एका मुलीशी लग्न केले. गेसी खूप मेहनती होता. दहा तास नौकरी करून तो संध्याकाळी जेसीज मध्ये सेवा द्यायचा. जेसीज मध्ये ही तो उच्च पदावर कार्यरत झाला.

मर्लीनच्या वडिलांनी त्याला आपल्या हॉटेल व्यवसायात त्याला घेतले आणि तो खूप यशस्वी झाला.

त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले होते. मात्र त्याला असे लक्षात आले होते की त्याला स्त्रियांपेक्षा पुरुषांचे जास्त आकर्षण आहे. तो हॉटेल मधल्या तरुण मुलांना पार्ट्या द्यायचा, त्यांना खूप दारू पाजून त्यांच्याशी लैंगिक चाळे करायचा. काहींना तो पैसे देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवू लागला. दारूच्या नशेत असताना तो तरुण मुलांना घरी घेऊन जायचा आणि त्यांचे लैंगिक शोषण करायचा.

तो आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत झाला होता. जेसीज मध्ये तो भरपूर काम करायचा. देणग्या आणायचा त्यामुळे त्याची एक प्रतिमा निर्माण झाली होती. पण त्याचा दुसरा चेहरा ही लोकांना दिसू लागला होता. पत्नींची अदलाबदल करणे, ड्रग्ज घेणे अश्लील चित्रपट बघणे हे सगळ तो करत होता.

लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून त्याला शिकागो येथे स्थलांतरित केले गेले. तिथे त्याने बांधकाम व्यावसाय सुरू केला. तरुण मुलांना तो नौकरऱ्या देऊ लागला. 

कॅन्सर पेशंट असलेल्या लहान मुलांचे मनोरंजन करणाऱ्या संस्थेत त्याने नाव कमावले. विदुषक बनून त्यांचे मनोरंजन तो करायचा आणि त्याच वेषात तो सगळीकडे फिरायचा त्याने स्वतःचा विदुषकाचा ड्रेस आणि मेक अप तयार केला होता. सहसा चेहर्‍यावर गोल रंग लावला जातो पण गेसी त्या गोलाला टोकदार करायचा. हा मेकअप चित्रपटातल्या खलनायक विदुषकाचा असतो.

तो पंधरा सोळा वर्षाच्या तरुण मुलांना घरी आणून त्यांचा बलात्कार करू लागला. एका मुलाला झटापटीत त्याने मारले आणि तो मेला. तेव्हा त्याला जाणवले की कुणालाही मारून टाकले की त्याला एक वेगळाच आनंद मिळतो. मेलेल्या मुलाला त्याने आपल्या घरातच पुरणे सुरू केले. 

कामावर असलेल्या मुलांकडून त्याने घरात एका ठिकाणी असे खड्डे तयार करून घेतले जिथे तो मेलेल्या मुलांना पुरू शकेल. कित्येक तरुण मुलांना तो नौकरीच्या आमिषाने किंवा अधिक पैश्याच्या आमिषाने घरी आणू लागला आणि अत्याचार करून त्यांना मारून टाकू लागला. एका प्रेतावर दुसरे असे तो प्रेत पुरून टाकायचा. शरीर कुजण्याची प्रक्रिया लवकर व्हावी म्हणुन तो चुन्याचेपाणी त्यावर ओतायचा. घरातली जागा भरल्यावर त्याने मेलेल्या मुलांना पुलावरून नदीत फेकून देणे सुरू केले.

मेलेल्या मुलांचे कपडे, दागिने, टीव्ही त्याच्या घरात होते. एका मुलाची गाडी त्याने विकून टाकली होती. अतिशय नाट्यमय पद्धतीने पुरावे गोळा करत या सगळ्याचा छडा लावला गेला आणि त्याच्या घरात पोलिसांना २६ प्रेत सापडले.

त्याने गुन्हा कबूल केला आणि इतर दोन प्रेत घरात कुठे पुरले आहेत तेही सांगितलं. आपण पाच प्रेत नदीत कुठे फेकले तेही त्याने सांगितले. मात्र त्यातील फक्त चार प्रेत सापडले. 

जवळपास सगळ्यांचा मृत्यू रात्री दोन ते चारच्या दरम्यान झाला होता. जवळपास सगळ्यांनाच त्याने गळा दाबून मारले होते. त्याला पुढे मृत्युदंडाची शिक्षा झाली. किलर क्लाउन म्हणजे खुनी विदुषक म्हणुन त्याचा उल्लेख केला जातो. 

त्याने आपल्या जबाबात कधीच आपल्या वडिलांबद्दल मनात राग असल्याचे सांगितले नाही. पण तो ही खंत व्यक्त करायचा की तो आपल्या वडिलांच्या मनात स्वतः साठी अभिमानास्पद जागा निर्माण करू शकला नाही. 

प्रतिकूल बालपण हे बर्‍याच गुन्हेगारांमध्ये दिसून येते. 

CPAG

Popular Posts