हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

अदृश्य पाऊलखुणा

By- Paresh Chitnis

  गुन्हेगार गुन्ह्याच्या स्थळी दिसतील असे पुरावे नष्ट करतात पण जे डोळ्याला दिसत नाही असे पुरावे मागे सोडून जातात. 

 बूट-चपलांचे ठसे बरेच वेळी घटनास्थळीआढळतात. हे ठसे दोन प्रकारचे असू शकतात. बुटाला खालून लागलेली धूळ फरशीवर अथवा कुठल्याही पृष्ठभागावर पाय दिल्याने जेव्हा मागे राहते तेव्हा बुटाच्या सोल चा शिक्का उमटतो. चिखल, माती, धूळ, पाणी, रक्त इत्यादी बुटाला खालून लागलं असेल आणि कुठल्याही पृष्ठभागावर जर पाय दिला तर ठळक खुणा दिसतात. हा पहिला प्रकार. या पाऊलखुणा दृश्य अथवा अदृश्य असू शकतात. 

  घटनास्थळी जर काही सांडलं असेल आणि जर त्यात कुणाचा पाय पडला तरी ही पाऊलखुणा सापडू शकतात. रक्त, रंग, माती, पाणी, शाई इत्यादी सांडले असेल आणि त्यावर पाय पडला तर उमटणार्‍या पाऊलखुणा हा दुसरा प्रकार आहे.

  दार उघडण्यासाठी दारावर मारलेल्या लाथा किंवा भिंती वर चढताना भिंतीला लावलेले पाय या सर्वांचे पुरावे पाऊलखुणा असू शकतात. काही तपासांत, विशेषतः हाणामारी आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या मृत्यूच्या घटनांमध्ये पीडित व्यक्ती किंवा मृत व्यक्तिच्या शरीर व कपड्यांवर ही बुटांचे ठसे आढळतात.

  घटनास्थळी किती व्यक्तींचा वावर होता हे पाऊलखुणांवरुन लक्षात येऊ शकते. येण्याचे व जाण्याचे मार्ग व घटना क्रम समजण्यासही याची मदत होते. 

 फर्शी किंवा मातीत पडलेल्या पायांचे ठसे लिफ्ट केले जातात. फर्शीवर उमटलेले ठसे लिफ्ट करण्यासाठी त्यावर चिकटपट्टी सारखी अॅडेसीव्ह फिल्म पसरवली जाते. बुटाच्या ठस्यातील फर्शीवरील धुळीचे कण त्या फिल्मवर चिकटतात. ही फिल्म कागदावर चिकटवून पुरावा जतन केला जातो. 

 मातीत पाय पडला की निर्माण होणारा बुटाचा ठसा लिफ्ट करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतात. पायाच्या वजनाने मातीवर दाब पडतो आणि ठसा उमटतो. या ठस्यात प्लास्टर ऑफ पॅरिस ओतून ते घट्ट झाल्यावर आपल्याला बुटाच्या पृष्ठभागाचा नमुना मिळतो.

  बुटाच्या कंपनीचे चिन्ह किंवा नाव, सोलच डिझाईन व बुटांचे माप या गोष्टी समजू शकतात. प्रत्येक व्यक्तिची चालण्याची पध्दत असते. त्यामुळे पायावर वेगवेगळ्या ठिकाणी पडणारा दाब व त्यामुळे बुटाची होणारी झीज ही वेगवेगळी असते. बुटाच्या ठस्यावरुन व्यक्तीचे वजन व चालण्याच्या पध्दतीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. 

पायापेक्षा मोठ्या मापाचा बूट वापरत असल्यास बुटाला चिरा गेल्या असतात. त्याही समजू शकतात. बूट फाटला असेल किंवा बुटाला काही लागलं असेल तर शू प्रिंट मध्ये ते दिसून येतं. 

जमिनीच्या अगदी जवळून उजेडाचा स्त्रोत फिरवला तर न दिसणार्‍या शू प्रिंट ठळकपणे दिसून येतात. 

यूव्ही लाइट मध्ये किंवा काही रसायनाचा वापर करून अदृश्य शू प्रिंट दृष्टीस पडतात. 

 

 

CPAG

Popular Posts