हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

जेव्हा बोटांचे ठसेही सारखे असतात

By- Paresh Chitnis

२० मे २००४ गुरुवार दुपारची वेळ. अमेरिकेत ओरेगोन येथे वकिली करणार्‍या ब्रँडन मेफील्डला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्यात आले होते. त्याला घ्यायला काही मित्र, त्याची बायको आणि तीन लहान मुले आले होते. दोन आठवड्यांच्या कारावासाने त्याचे आयुष्य बदलून गेले होते. आपण कधीच सुटणार नाही आणि आपल्याला देशद्रोही दहशतवादी ठरवून मृत्युदंड देणार हे जवळ जवळ निश्चित वाटत असताना सुटका अशक्य होती.

११ मार्च २००४ रोजी मॅडरीड, स्पेन येथे ट्रेन मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्ब हल्ल्यात १९३ लोकं मारली गेली आणि २०५० लोकं जखमी झाली होती. त्या हल्ल्याशी संबंधित सापडलेल्या एका निळ्या पिशवीवर सापडलेल्या बोटांचे ठसे ब्रँडन मेफील्ड याच्या ठशांशी शंभर टक्के जुळतात असे एफबीआयने शोधले. अमेरीकेत सैन्यात काही काळ सेवा केली असल्याने ब्रँडन मेफील्डचे ठसे ४० लाख ठशांमध्ये एफबीआय कडे होते.
दोन आठवड्यांपूर्वी ६ मे रोजी एफबीआयचे दोन एजंट पिक्चर मध्ये दाखवतात तसे, एक उंच पुरुष आणि एक ठेंगणी स्त्री, ब्रँडन मेफील्डच्या ऑफिस मध्ये शिरले आणि त्याला अटक करून बर्‍याच वस्तू जप्त करून घेऊन गेले.
ब्रँडन मेफील्डच्या बोटांचे ठसे हे 'शंकेच्या पलीकडे शंभर टक्के' जुळत आहेत असा दावा एफबीआयने केला होता. स्पेन च्या पोलिसांनी मात्र १३मे ला म्हणजे मेफील्डच्या अटकेपूर्वी 'निगेटिव्ह मॅच' असा रीपोर्ट एफबीआयला कळविला. स्पेन पोलिसांच्या मते एफबीआयने वापरलेले पुराव्याचे ठसे नीट घेतले नव्हते व ते ब्रँडन मेफील्डच्या बोटांच्या ठश्यांशी तंतोतंत मेळ खात नव्हते.
मात्रं एफबीआय ही स्पेन पोलिस पेक्षा जास्त वरचढ संस्था असल्याने त्यांनी या रीपोर्टला जुमानले नाही. ब्रँडन मेफील्डला अटक झाली आणि तो धर्मांतरित मुसलमान असून त्याचे अल कायदाच्या लोकांशी संबंध असल्याचा उल्लेख त्या आरोपपत्रात होता. त्याला 'मटेरिअल विटनेस' म्हणजे पुरावे नसतानाही अटक करू शकतो असा आरोपी म्हणुन अटक करण्यात आली होती. ज्या पिशवीवर त्याच्या बोटांचे ठसे सापडले होते त्यात डिटोनेटर व स्फोटके सापडली होती. १९३ लोकांचा खून करणाऱ्या ब्रँडन मेफील्डचे शिक्षा अटळ होती.
मात्रं १९ मे रोजी स्पेन पोलिसने हे बोटांचे ठसे अर्जेंटीनाच्या आओहनाने दाओदचे असल्याचा दावा केला. या नंतर एफबीआयला जाग आली व त्यांनी पहिल्यांदा त्या पिशवी वर असलेले बोटांचे ठसे तपासायचे ठरवले. आत्तापर्यंत ते बोटांच्या ठश्यांच्या फोटो च्या नकलेवर अवलंबून होते. मात्र आता बोटांचे ठसे पुसले गेले होते. एफबीआय ने चुकीचा तपास केला होता. त्यांच्या कडून खूप मोठी चूक झाली होती.
सापडलेले ठसे २० संशयितांशी मेळ खात असताना मेफील्डचेच नाव का घेण्यात आले? मेफील्डने लग्नानंतर इस्लाम धर्म स्विकारला होता. तो लहान मुलांच्या अधिकारांसाठी काम करत होता व अफगाणिस्तानात लहान मुलांचे अमेरिकी धोरणामुळे होणार्‍या हालअपेष्टां विरुद्ध अल कायदाचे उघडपणे समर्थन करत असे. तो ज्या मस्जिदीत नमाजसाठी जात असे त्याच ठिकाणी दहशतवादींशी संबंध असलेले लोक पण येत असत. त्याला काही वर्षांपूर्वी संशयित म्हणुन पकडून बोटांचे ठसे वगैरे घेऊन सोडून देण्यात आले होते. एफबीआयने अधिकारांचा वापर करून सगळी माहिती गोळा केली आणि त्यांनी स्वतःचे मत निर्माण करून टाकले.
बोटांचे ठसे खूप सारखे होते पण अगदी सारखे नव्हते. घाईत तपास पूर्ण केला व ईतर गोष्टींचा प्रभाव त्यांच्या अभ्यासावर झाला होता. पूर्वग्रहदूषित तपासाचे हे खूप भयंकर उदाहरण आहे.
अमेरिकी सरकारने ब्रँडन मेफील्ड व त्यांच्या परिवाराला २ दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई दिली व त्यांची जाहीर माफी मागितली.
प्रत्येकाचे बोटांचे ठसे जरी वेगळे असले तरी ही अशी चूक होऊ शकते हे लक्षात ठेऊन तपास करणे आवश्यक आहे.
 

CPAG

Popular Posts