हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

विषारी महत्त्वाकांक्षा

By- Paresh Chitnis

१३ फेब्रुवारी २०१७, मलेशियाचे अंतरराष्ट्रीय विमानतळ, सकाळचे साधारण ९ वाजलेले. किम चोल नावाने प्रवास करायला निघालेल्या प्रवाशाच्या चेहर्‍याला अचानक एक स्त्री येऊन ओला रुमाल पुसते. तिच्या मागोमाग अजून एक स्त्री असेच करते. किमला चक्कर आल्यासारखे वाटते. तो पोलिसांना सांगतो. पोलिस अधिकारी त्याला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी घेऊन जातात. तो कोसळतो. त्याला दवाखान्यात नेताना रस्त्यातच त्याचा मृत्यु होतो. किम चोल हा खरंतर किम जाँग नाॅम म्हणजे उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जाँग ईल याचा सगळ्यात मोठा पुत्र. त्याचा सावत्र भाऊ किम जाँग उन आज उत्तर कोरियाचा हुकुमशाह आहे. असे मानले जाते की त्यानेच आपल्या भावाला संपवून स्वतःचा राज्यकर्ता होण्याचा मार्ग मोकळा केला.
पण हा खून घडवून आणण्यासाठी नेमकं काय वापरण्यात आले होते? "वी एक्स नर्व एजंट" हे एक असे भयंकर रासायन आहे ज्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी आहे. त्या दोन महिलांनी दोन वेगळी रसायने त्याच्या चेहर्‍याला लावली. त्या दोन रसायनांच्या प्रक्रियेतून वी एक्स तयार झाले असावे.
नर्व एजंट गॅस चा शोध मिलिटरी साठी लावला गेला होता. त्याला सामुहिक विनाशाचे शस्त्र हा दर्जा प्राप्त आहे. म्हणजेच नर्व एजंट गॅस हा आण्विक शस्त्राप्रमाणे मोठ्या प्रमाणात विनाश घडवू शकतो. हे रासायन नैसर्गीक नसून ते तयार करावे लागते. त्याचे उत्पादन करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकारच्या रसायनांचा शोध डॉ गेरहार्ड श्राडर यांच्याकडून चुकून लागला. ते जर्मन शास्त्रज्ञ होते. ते किटकनाशकांचा शोध घेत होते. त्यांनी चार नर्व एजंट चा शोध लावला. जर्मनीने त्यांचा हा शोध गोपनीय ठेवला व युद्धात त्याचा वापर करण्याचे ठरविले. ताबून, सरीन, सोमान, सायक्लोसरीन हे चार घातक नर्व एजंट तयार करण्यात आले. त्यांचा डोस अत्यल्प असून परिणाम खूप भयंकर होता. महायुद्धात वापर करण्यासाठी जर्मनीने ताबून तयार करण्याची फॅक्टरी सुरू केली होती. तीन हजार कामगार तेथे काम करत होते. दोन वर्षात तेथे तीनशे लोक दुर्घटनांमध्ये मेली.  नाझी सैन्याने दहा ते तीस हजार टन नर्व एजंट उत्पादित केला.
१९५२ मध्ये लंडन येथे डॉ रणजित घोष व डॉ न्यूमन यांनी वी सिरीज चे नर्व एजंट चा शोध लावला. डॉ रणजित घोष हे किटकनाशकांचा शोध घेत होते. अमिटाॅन नावाचे किटकनाशक बाजारात आणले पण ते खूप घातक असल्याने ते बंद करण्यात आले व त्याचा अभ्यास रासायनिक शस्त्र म्हणून सुरू करण्यात आला.

सामूहिक कत्तल करण्यासाठी याचा वापर अंगोला मध्ये क्यूबा या देशाने केला होता. १९८४ मध्ये संयुक्त राष्ट्राला अंगोलाच्या जमिनीत पाण्यात व रुग्णांच्या शरीरात नर्व एजंट सापडले.
सद्दाम हुसेन याने वी एक्स नर्व एजंट चे संशोधन केल्याची कबुली दिली होती मात्र त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे त्याने मान्य केले नाही.

उत्तर कोरिया कडे वी एक्स नर्व एजंट चा साठा असल्याचे मानले जाते. अमेरिका ब्रिटन रशिया उत्तर कोरिया सीरीया क्यूबा या देशांकडे नर्व एजंट बनविण्याचे तंत्रज्ञान आहे.

किम जाँग उन याने त्याच्या भावाचा वध करण्यासाठी वी एक्स चा वापर केला. मलेशियाच्या क्वालालंपूर विमानतळावर वी एक्स चा वापर झाल्याने मलेशिया ढवळून निघाले. भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वी एक्स वापरल्याचे ठोस पुरावे असून ही उत्तर कोरिया त्याची जबाबदारी घेत नव्हता. संयुक्त राष्ट्रांच्या कराराप्रमाणे या रसायनांच्या वापरावर बंदी आहे. किम जाँग नाम वर विष प्रयोग होताच पुढील पंधरा मिनिटात त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आला. त्याला अॅटरोपिन देण्यात आले मात्र त्याने काही मिनिटात प्राण सोडले. वी एक्स त्वचेतून शरीरात शोषून घेतले जाते. वी एक्स हा तरल पदार्थ नसल्याने त्याचे पुरावे सहज सापडतात. ज्या महिलेने किम जाँग नामच्या चेहर्‍याला वी एक्स लावले तीला नंतर अटक झाली व सोडून देण्यात आले. वी एक्स चा प्रभाव तिच्यावर ही झाला होता. किम जाँग नामच्या शव विच्छेदनात वी एक्स आढळले.
ही एक गूढ घटना होती तिचे पुरावे असून ही त्याबद्दल पुढे काही झाले नाही. मलेशिया आणि उत्तर कोरियाचे संबंध बिघडले. वी एक्स हे मानवी संशोधनातील सर्वात घातक रासायन आहे. मानवी महत्त्वाकांक्षा या विकोपाला गेल्या तर असल्या रसायनांचा दुरुपयोग विनाशाचे कारण होऊ शकतो. 

CPAG

Popular Posts