हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

सुपर ग्लू : चुटकी में चिपका

By- Paresh Chitnis

बोटांचे ठसे बघण्यासाठी त्यावर काळी डस्टींग पावडर ब्रशने टाकली जाते आणि ठसे दिसू लागतात. असा सीन आपण चित्रपट किंवा सीआयडी सारख्या मालिकेत बघितला असेल. आपल्या हाताच्या बोटांवर ज्या रेघा असतात त्यातून घाम आणि इतर  स्त्राव येत असतो. कुठल्याही वस्तूला हात लावल्यास घाम त्या वस्तूवर बोटांचे ठसे सोडतो. हे ठसे डोळ्यांना दिसत नाही. त्या वस्तूवर भिरकवलेली डस्टींग पावडर घामाला चिटकून बसते आणि बोटांचे ठसे दिसू लागतात.

 एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर काही वेळातच घामाचे बाष्पीभवन होऊन बराचसा घाम उडून जातो. त्यामुळे डस्टींग पावडरने खूप जुने बोटांचे ठसे दृश्य करता येत नाहीत.

 ओबडधोबड वस्तूवरील बोटांचे ठसे डेवलप करणे डस्टींग पावडरने कठीण जाते. बरेचदा बंदूक, रेडियो, सीडी, दागिने इत्यादी वरील बोटांचे ठसे शोधणे हे डस्टींग पावडरने शक्य नसते. अश्या वेळी सायनोएॅक्रिलेट या रसायनाचा वापर केला जातो. सायनोएॅक्रिलेट हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या नेहमीच्या वापरतलं सुपर ग्लू आहे. फेवी क्विक या नावाने भारतात सुपर ग्लू बाजारात मिळतो.

 सायनोएॅक्रिलेट किंवा सुपर ग्लूची वाफ करून पुराव्या दाखल सापडलेली वस्तू या वाफेच्या संपर्कात आणल्यास बोटांचे ठसे दिसू लागतात. बोटांचे ठसे डेवलप होतात असे आपण म्हणतो. 

 बोटांच्या रेघांमधून घामाबरोबर अमीनो अॅसिड, फॅटी अॅसिड, प्रथिने यांचा स्त्रावही होत असतो. घामाचे बाष्पीभवन होऊन घाम उडून जातो मात्र हे घटक मागे राहतात. अनेक महिने हे घटक तसेच राहतात. सुपर ग्लूची वाफ याच घटकांवर जाऊन बसते आणि बोटांचे ठसे दिसू लागतात.

 सायनोएॅक्रिलेट किंवा सुपर ग्लू हे अत्यंत घातक व विषारी वाफा निर्माण करते. याचा वापर बंद चेंबर मध्ये केला जातो. एका छोट्याश्या काचेच्या भांड्यात दोन थेंब सुपर ग्लू टाकून पाण्याची व सुपर ग्लूची वाफ निर्माण केली जाते. काही मिनिटात वस्तूवरील बोटांचे ठसे स्पष्ट दिसू लागतात. हे निर्माण झालेले ठसे सहज खराब होत नाहीत म्हणुन ते कायमस्वरूपी जतन करता येऊ शकतात.

 चेंबर मध्ये ठेवता येतील अश्या वस्तूंवरील बोटांचे ठसे सुपर ग्लूने डेवलप करता येतात. बंदूक, सुरी, इतर छोटे हत्यार, कुलूप किल्ल्या, ग्लास, कप, बाटली, पेन, सीडी, पेन ड्राईव इत्यादी वस्तूंवरील ठसे डेवलप करण्यासाठी ही पद्धत खूप उपयोग आहे.

 सुपर ग्लू जसं तुटलेल्या वस्तूंना चुटकीसरशी चिकटवतो आणि घट्ट चिकटतो तसाच बोटांचे ठसे ही चुटकीसरशी तयार करण्यात उपयोगी पडतो. सायनोएॅक्रिलेट हे विषारी रासायन असल्याने याचा उपयोग जपून करणे आवश्यक आहे. 

 

CPAG

Popular Posts