हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

कोणीतरी आहे तिथे

By- Paresh Chitnis

छोटीसी बात चित्रपटात अमोल पालेकर विद्या सिन्हाचा रोज पाठलाग करतो. सकाळी बस स्टॉप पासून तिच्या ऑफिस पर्यंत आणि संध्याकाळी तिच्या ऑफिस पासून घरापर्यंत तो दररोज तिच्या मागे मागे फिरत असतो. प्रत्येक पाठलाग करणारा हा भोळा भाबडा असेलच असे नाही. तो डर चित्रपटातल्या शाहरुख खान सारखा एखादा विक्षिप्त तरुणही असू शकतो. 

पाठलाग करून एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती किंवा दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे. याला स्टॉकिंग असे म्हंटले जाते.

स्टॉकिंगचा त्रास हा जास्ती प्रमाणात तरुण स्त्रियांना दिला जातो. वयस्कर व्यक्ति, सेलिब्रिटी किंवा ख्यातनाम व्यक्ति यांना ही स्टॉकिंगचा त्रास दिला जातो. काही कर्मचारी आपल्या वरिष्ठांना किंवा कामगार त्यांच्या सुपरवायझरला स्टॉक करतात. गुन्हे नोंदणी चा आधार घेतला तर स्टॉकिंगचे जास्त गुन्हे हे सामान्य तरुण स्त्रियांनी नोंदवले आहेत असे समजते.

पाठलाग करणारी व्यक्ति बरेचदा ओळखीची असते. पाठलाग करणारी अनोळखी व्यक्ति ही बरेचदा आपला उद्देश काय आहे हे कळू देत नाही. पाठलाग करणारे गुन्हेगार बरेचदा हल्ला करून शारीरिक इजा करतात. स्टॉकिंगची सुरुवात आणि हल्ला या घटनांमध्ये काही काळाचे अंतर असते. हे अंतर पाच वर्षांपर्यंतचे काही केसेस मध्ये नोंदवले गेले आहे.

स्टॉकिंग करणारे लोक मनोरुग्ण असतातच असे नाही मात्र त्यांची मानसिक स्थिती सामाजिक दृष्टीने फार चांगली नसते. स्टॉकिंग करणार्‍या व्यक्तींचे बालपण चांगले नसते व ते समाजात चांगल्या प्रकारे मिसळत नाहीत असे सामान्यपणे म्हंटले जाते. रिजेक्शन म्हणजे नाकारले गेल्याची भावना या लोकांमध्ये बरेचदा असते असे ही दिसून येते. प्रेमात नकार मिळालेला प्रियकर, घटस्फोट दिलेला नवरा किंवा प्रेम संबंध मोडलेला प्रियकर, हे नकार सहन करू न शकलेले लोक बरेचदा स्टॉकिंग करतात. असं स्टॉकिंग दोन ते चार आठवड्यात संपुष्टात येतं पण कधी कधी हे वाढत जाऊ शकतं. प्रेयसी इतर कुणा बरोबर दिसली तर हा नकार मिळालेला प्रियकर स्टॉकिंग करून भीती निर्माण करू शकतो. काही स्टॉकर्स उपद्रवी वाटत नाहीत पण ते अचानक हल्ला करू शकतात. ज्याला मानसशास्त्रात बॉर्डरलाइन डिसॉर्डर म्हणतात त्या प्रकारचे स्टॉकर्स प्रेम करता करता अचानक तिरस्कार करायला लागु शकतात. अशी लोकं बरेचदा प्रसिद्ध व्यक्तींना स्टॉक करतात. त्यांची वास्तविकता व कल्पना यात गल्लत होत असते. जिचा पाठलाग ते करत असतात ती आपल्यावर प्रेम करते व आपले तिचे मिलन होणार आहे अश्या कल्पना ते करत असतात. 

नाण्याची दुसरी बाजू म्हणजे एका अभ्यासात असे समजले की बहुतांश स्त्रिया ज्यांना कोणीतरी स्टॉक करत होते त्यांना ते केलेल आवडत होतं. बर्‍याच स्त्रिया स्टॉकर्स कडे फक्त दुर्लक्ष करतात त्यांची तक्रार करत नाही असं ही लक्षात आलं. स्टॉकर्स हे इंपलसीव असतात. घटकेत मनात येईल तसे करतात. ते खूप भावनावश असतात. जिचा पाठलाग करत आहेत तिच्या कुठल्याही वर्तनाचा राग आला तर ते अतिरेकी भूमिका घेऊन त्या व्यक्तीला शारीरिक हानी करू शकतात. 

प्रेमात पडलेला स्टॉकर हा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो पण धीर होत नसल्याने किंवा नकाराच्या भीतीने तो पाठलाग करून सतत त्या व्यक्तिच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत अस्तो. तो प्रेयसीच्या नातेवाईकांशी ओळख करून संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकतो. भेटवस्तू पाठवणे, पत्र लिहिणे, मोबाईलवर मिस्ड कॉल देणे असे काय काय तो करत असतो. मुली असे करत नाहीत असे नाही पण तरुण मुलांचे स्टॉकिंगचे प्रमाण जास्त आहे. 

सतत कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे या कल्पनेने मनात भीती निर्माण होते. आपला पाठलाग करणारा आपल्याला लपून पहात असेल या भीतीने अनेक पीडित स्त्रिया कपडे बदलणे आणि स्नान करणेही टाळतात. ही मानसिक दहशत पीडित व्यक्तीच्या आयुष्यात डिप्रेशन आणि चिंता निर्माण करते. 

नवऱ्याने किंवा प्रियकराने पूर्वी शारीरिक मारहाण केली असेल तर अश्या व्यक्तीने स्टॉकिंग केल्यास अजूनच भीती निर्माण होते. माझी नाही झालीस तर तुला इतर ही कुणाची होऊ देणार नाही असे डायलॉग बोलणारे स्टॉकर प्रेयसीचा खून, तिच्यावर अॅसीड हल्ला, विद्रूपीकरण किंवा शारीरिक व्यंग निर्माण होईल इतकी मारहाण करू शकतात. 

आज सोशल मीडिया च्या काळात तर स्टॉकिंग अजूनच सोपं झाल आहे. एखादी व्यक्ति इंटरनेट वर दिवसभर काय करते कुठले फोटो टाकते, कोणाशी मैत्री करते, या सगळ्याची पाळत ठेवणे आणि अश्या माहितीचा वापर करून दहशत निर्माण करणे म्हणजे सायबर स्टॉकिंग. पाठलाग करून स्टॉकिंग करणे यापेक्षा सायबर स्टॉकिंग सोपे आहे. घरात बसुन एकाच वेळी अनेक लोकांचे सायबर स्टॉकिंग करणारे स्टॉकर्स आहेत. ईमेल, चॅट मेसेज च्या माध्यामातून धमकावणे, छळणे, अश्लील फोटो व विडिओ शेअर करायला भाग पाडणे व नंतर ब्लॅकमेल करणे आणि पैसे मागणे या गोष्टी सायबर स्टॉकिंग मध्ये होताना दिसतात. मुलींचे अश्लील चित्रं सोशल मीडिया वर पोस्ट करणारे सायबर स्टॉकर हे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अ प्रमाणे आणि जे पाठलाग करून त्रास देतात ते भा दं वि ३५४ड प्रमाणे शिक्षेस पात्र आहेत. 

जर कोणी धमकीचे किंवा अश्लील मेसेज किंवा चॅट तुमच्याशी करत असेल तर त्याचे स्क्रीन शॉट काढून पुराव्यासाठी ठेवा. ईमेल किंवा मेसेज डिलीट करू नका. सायबर तज्ञ त्या सायबर स्टॉकरला शोधू शकतात. प्रत्येक ईमेल मध्ये एक ईमेल हेडर असतो ज्यातून आपण ईमेल पाठवणाऱ्याची माहिती शोधू शकतो. सायबर विश्वात अनेक अदृश्य पुरावे निर्माण होत असतात आणि आपली ओळख लपवणे तितके सोपे नाही. 

CPAG

Popular Posts