हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

वारस्याची पावडर

By- Paresh Chitnis

इंग्लंड इटली आणि फ्रांस मध्ये मागील शतकात नवऱ्याचा खून करण्यासाठी किंवा वारसदारांनी आपल्या श्रीमंत नातेवाईकांना मारण्यासाठी वापरलेले विष म्हणजे आरसेनिक ऑक्साईड. फोरेन्सिक भाषेत ज्याला आयडियल पाॅईजन किंवा आदर्श विष म्हणता येईल ते  आरसेनिक ऑक्साईड. कुठलीही चव नाही. कुठलाही वास नाही. पाण्यात आणि खाद्यपदार्थात सहज मिश्रित होणारे हे रासायन विषबाधा करणाऱ्यांसाठी वरदान होते. सफरचंद किंवा पेअर सारख्या फळावर मीठासारखे भुरभुरले की झाले. इंग्लंड व फ्रांस मध्ये पुडिंग व सूप मध्ये आरसेनिक ऑक्साईड टाकून अन्नातून विष दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

 

कॉलेरा या आजाराची जी लक्षणं असतात तीच लक्षणं आरसेनिक विष बाधेची असतात. त्या काळात पेनिसीलीन किंवा सल्फा ड्रग्सचा शोध लागला नव्हता एन्टीबायोटिक तर खूप नंतर आले. त्यामुळे कॉलेराने मृत्यू होणे साधारण बाब होती. 

आरसेनिक मुळे झालेला मृत्यू हा सहजपणे नैसर्गीक मृत्यू म्हणुन नोंदवला जायचा. 

उलट्या जुलाब होणे, पोटात कळा येणे, खूप वेदना होणे ही सगळी लक्षणे जशी कॉलेराची तशीच आरसेनिक विष बाधेची पण असल्याने डॉक्टर नैसर्गिक मृत्यूची नोंद करून मोकळे व्हायचे. 

मेरी कॉटन नावाच्या महिलेने आपले चार पैकी तीन पती, दोन प्रियकर व अकरा अपत्यांना आरसेनिकच्या प्रयोगाने मारले. तिने एकूण एकवीस खून या प्रकारे केले. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी तिने हे केले होते. तर कधी कधी शेजार्‍यांचा त्रास संपवण्यासाठी तिने याचा वापर केला. तिला नौकरीची गरज होती आणि उरलेल्या शेवटच्या मुलाला तिला अनाथाश्रमात ठेवायचे होते. मुला बरोबर तुला ही तिथे राहावे लागेल असे नौकरी देणार्‍याने सांगितल्यावर ती सहजच बोलून गेली की, "तसाही तो आजारीच आहे, जसे सगळे कॉटन परिवारातले लोकं गेले तसाच हा पण लवकरच जाईल." तिचा मुलगा अजिबात आजारी दिसत नव्हता. ऐकणार्‍या व्यक्तीला शंका आली. पाच दिवसातच तीने आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी दिली. आता संशय अजून वाढला. कसे तरी करून तिच्या मुलाचा मृत्यूचा दाखला मिळण्यापासून रोखला आणि डॉक्टरांना शव विच्छेदन करायला विनवले. मेरी विमा कंपनी कडे पैसे मागायला गेली मात्र मृत्यूचा दाखला नसल्याने तिला पैसे मिळाले नाही. तेव्हा प्रचलित असलेली आरसेनिकची चाचणी म्हणजे शवाच्या पोटाचा तुकडा उकळून द्रव रुपात आणून त्यावर रासायनिक चाचणी करणे. त्यात आरसेनिक सापडल्यावर तिच्या परिवारातील सर्व मृत व्यक्तींचे पुरलेले शव उकरून त्यांची तपासणी करण्यात आली. सर्वांमध्ये आरसेनिक सापडले. तिच्यावर खटला चालवण्यात आला. तिला फाशीची शिक्षा झाली. 

चीन मध्ये आरसेनिक बद्दल खूप पूर्वीपासून माहिती होती. राजकीय व राजेशाही घराण्यातील घातपात घडवून आणण्यासाठी दारू मध्ये आरसेनिक मिसळून दिले जात असे. 

नवऱ्याला मारण्यासाठी आरसेनिक अन्नात मिसळणे हे इंग्लंड मध्ये प्रचलित असले तरी अमेरिकेत याची पहिली केस १८३०—३५ च्या दरम्यान झाली. रिबेका कोपिन हिने आपल्या पती जॉनला मारण्याचा प्रयत्न केला होता. योगायोगाने डोमेस्टिक वाॅयलन्सची पण ही एक जगातली जुनी केस आहे. 

मेरी अॅलिस लिविंग्स्टन ही एका श्रीमंत घरात जन्माला आलेली स्त्री होती. पण आर्थिक व सामाजिक परिस्थिती लग्न कुठे होतय यावर अवलंबून असलेला तो काळ होता. मेरीचे पाहिले प्रेम प्रकरण अयशस्वी ठरले. ती गर्भवती झाली पण तिचे लग्न झाले नाही. दुसरे प्रेम ही असेच संपले. त्यानंतर लगेचच तिसर्‍या व्यक्तीने तिला नाकारले. अविवाहित आणि तीन मुलींची ती आई होती. दहा वर्ष असेच सहन करत काढले आणि ती पुन्हा प्रेमात पडली. या ही वेळी असेच झाले. तिला पुन्हा चौथ्या प्रेमातून अपत्य झाले पण लग्न झाले नाही. 

मेरीच्या वडिलांनी तिच्या आईला व तिला बरीच संपत्ती मागे सोडली होती मात्र तिची आई जिवंत असेपर्यंत ती तिला मिळणार नव्हती. 

तिची आई जवळच्या घरात तिच्या सावत्र वडिलांबरोबर राहत होती. एके दिवशी तिने आपल्या आईला काही तरी खाण्याचा पदार्थ बनवून मुलींच्या हाती पाठवला. ते खाताच तिच्या आईला त्रास होऊ लागला. तेव्हा ती घरात एकटीच होती. म्हातार्‍या आईची मैत्रीण सहज भेटायला आली आणि तिची अवस्था पाहून तिने डॉक्टरला बोलावले. डॉक्टर येताच तिने सांगितले की माझ्या नातेवाईकांनीच संपत्ती साठी मला विष दिले आहे. आणि ती गेली. 

तिच्या शरीरात व जेवणाच्या भांड्यात आरसेनिक सापडले. मेरीने खूप प्रयत्न केला सांगायचा की माझी आई माझी मैत्रिण होती मी कसे तिला मरीन, पण कोणीही विश्वास ठेवला नाही. तिला अटक झाली पण मीडियाने तिला स्वतःच्या आईची खुनी असे न दाखवता, चार बाळांची अविवाहित आई असे दाखवले. तिला शिक्षा झाली तर चार मुलांचे भविष्य अंधारात जाईल असे चित्र निर्माण केले. चार पुरुषांनी तिला फसवले. श्रीमंत घरी जन्मलेली स्त्री हलाखीत जगत होती असे चित्र निर्माण झाले. दरम्यान मेरीला आई च्या मृत्यूनंतर खूप पैसे मिळाले. तिने चार्ल्स ब्रूक नावाचा मोठा वकील नेमला. त्याने वृत्तपत्रांमधील मेरीच्या प्रतिमेचा फायदा करून घेतला. त्याने या प्रकरणाला वेगळे वळण दिले. त्याने न्यायालयासमोर असे मांडले की मेरीची आई ही नेहमी आरसेनिक खात होती त्यामुळे तिच्या शरीरात व घरात सगळीकडे आरसेनिक सापडले. त्याकाळात 

आरसेनिक सौंदर्य वाढविण्यासाठी थोड्या प्रमाणात खाण्याचे फॅड आले होते. आरसेनिक खाल्ल्याने त्वचा सुंदर होते म्हणुन आरसेनिकचे बिनविषारी वेफर्स बाजारात सर्रास मिळत होते. स्टायरियन म्हणुन ओळखले जाणारे हंगेरी आणि ऑस्ट्रिया जवळचे लोक लहानपणापासून आरसेनिक खात असत. सुरुवातीला तीस मिलिग्रॅम आठवड्यातून दोन तीन वेळा खाणारे हे लोक पुढे तीन शे मिलिग्रॅम खाऊ लागतात. हा डोस सामान्य व्यक्तीला दहा मिनिटात मारायला पुरेसा आहे. या युक्तीवादाला स्टायरियन युक्तिवाद असे नाव प्रचलित झाले. शेवटी न्यायालयाने मेरीला निर्दोष सोडले. स्टायरियन युक्तिवाद, मेरी साठी सहानुभूती की अजून काही या साठी कामात आले हे कळले नाही. 

हा निर्णय का घेतला हे कधीच कळले नाही. 

संपत्तीसाठी वारसदारांनी विषप्रयोगासाठी आरसेनिकचा वापर खूप प्रकरणांमध्ये केल्याने  त्याला 'इनहेरिटन्स पावडर' किंवा 'वारस्याची पावडर' असे नाव प्रचलित झाले. 

CPAG

Popular Posts