हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

फिंगरप्रिंटींग मध्ये भारतीय योगदान

By- Paresh Chitnis

  फिंगरप्रिंटींग म्हणजे बोटांचे ठसे व्यक्तिची ओळख पटवण्यासाठी वापरणे. इंग्रजी हाॅलिवूड चित्रपटात आपण बोटांचे ठसे संगणकांवर मिळवून काही क्षणात संशयित शोधला जातो असे पाहतो. हे तंत्रज्ञान भारतात तयार करण्यात आले.
  १८५८ मध्ये याचा अभ्यास सुरू करून १८७७ साली सर विलयम जेम्स हर्षेल यांनी भारतात हुगली, कलकत्ता येथे बोटांचे ठसे करारांवर घेण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी चीन मध्ये आंतराष्ट्रीय रेशीम बाजारपेठेत व्यवहार करताना बोटांचे ठसे घेतले जात असत मात्र व्यक्ति ओळखण्यासाठी त्याचा तितकासा ऊपयोग होत नसे.
  १८९२ साली फ्रांसिस गॅल्टन यांनी फिंगरप्रिंट्स नावाचे पुस्तक प्रकाशित केले. आणि १८९७ मध्ये भारतात कलकत्ता येथे जगातील पहिले फिंगरप्रिंट ब्यूरो सुरू करण्यात आले. अजीज उल हक व राय बहादूर हेमचंद्र बोस या दोन भारतीय वंशाच्या कर्मचार्‍यांनी फिंगरप्रिंटचे वर्गीकरण करण्याची पद्धत निर्माण केली. अजीज उल हक यांनी त्यातील गणिती पद्धत यात मोलाचे काम केले आहे. त्यांनी निर्माण केलेली पद्धत त्या काळी त्यांचे ब्रिटिश वंशाचे सुपरवायजर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांच्या नावाने जगभर प्रसिद्ध झाली. हेनरी क्लासिफीकेशन सिस्टम या नावाने प्रसिद्ध झालेली ही पद्धती आज ही जगभरात वापरली जाते. जगातील कोणत्याही दोन व्यक्तींचे बोटांचे ठसे सारखे नसताना त्याचे वर्गीकरण १०२४ वर्गांमध्ये करून कोणत्याही बोटांचे ठसे सापडले असता आपल्याकडील असंख्य ठश्यांशी ते कसे मेळ घालून पहावे या साठी त्या काळात कुठलेही संगणक नसताना जी पद्धत वापरली जायची ती भारतीयांनी तयार केली. हेनरी यांनी अजीज उल हक व राय बहादूर हेमचंद्र बोस या दोघांना ब्रिटिश सरकार दरबारी त्याबद्दल मान व मानधन मिळवून दिले हा त्याचा मोठेपणा. कारण सगळे संशोधन त्याच्या नावे प्रसिद्ध झाले असताना त्याने या दोघांना ओळख मिळवून देणे त्याच्यासाठी गरजेचे नव्हते.
  ब्रिटिश राजवटीत जगभर या पद्धतीला अनिवार्य केल गेलं. स्कॉटलंड पोलिस यांनी १९०१  तर अमेरिकी पोलिस यांनी १९०२ साली ही पद्धती गुन्हेगारांची ओळख पटवण्यास वापरायला सुरुवात केली.
  आज संगणकाचा वापर करून 'अफिस' सारखे प्रगत तंत्रज्ञान निर्माण झाले आहे. गुजरात या तंत्रज्ञानाच्या वापरात भारतात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रात ही ही प्रणाली पोलिस वापरू लागले आहेत. त्यामुळे बोटांचे ठसे मिळताच संशयितांची ओळख पटणे अधिकच प्रगत झाले आहे. फिंगरप्रिंटींग या विषयाचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद, मुंबई, नागपूर येथे सरकारी शैक्षणिक संस्था आहेत. गुजरातेत गांधीनगर येथे खास विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या क्षेत्रात डेटा अॅनॅलिसीसला देखील मागणी आहे.
 

   
CPAG

Popular Posts