हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

सोशल मीडियावर गोपनीयता एक अंधश्रद्धा

By- Paresh Chitnis

तुम्हाला जर एका अनोळखी व्यक्तिचा ईमेल आयडी आणि पासवर्ड मिळाला तर तुम्ही काय गुन्हा करू शकतात? आणि जर तुम्हाला दहा हजार लोकांचा ईमेल आयडी आणि पासवर्ड मिळाला तर तुम्ही काय गुन्हा करू शकतात?

आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड ही आपली गोपनीय माहिती आहे. कुणाच्या हाती ही माहिती लागली तर आपले अकाऊंट हॅक होऊ शकते. हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुमचा ईमेल हॅक करून तुम्हाला तुमच्या माहितीतली व्यक्ति जास्त त्रास देऊ शकते पण दुसर्‍या देशातला अनोळखी हॅकर तुम्हाला काय त्रास देऊ शकतो? आणि त्याला त्यातून पैसे कसे मिळतील?

नाशिक मधल्या एका परिचित व्यक्तीचा मला फोन आला. ते घाबरलेले होते. मी विचारलं हा कोणता मोबाईल नंबर आहे ज्यावरून तुम्ही बोलताय? नंबर बदललात का? तर ते दबक्या आवाजात म्हणाले, माझा कोणी तरी पाठलाग करत आहे. माझे सगळे ईमेल आणि फोन कॉल कोणी तरी टॅप करत आहे.

प्रकरण गंभीर वाटलं म्हणुन मी विचारलं की तुम्हाला कसं कळलं? ते म्हणाले मला एक मेल येतेय सारखी. त्या ईमेल मध्ये असे लिहिले आहे की तुमच्या सर्व हालचालींवर आमचे लक्ष आहे. तुमचा ईमेल आयडी हा आहे आणि त्याचा पासवर्ड हा आहे तुमचा फोन नंबर हा आहे. मी म्हंटल पासवर्ड बदलून टाका. तर ते म्हणाले त्या ईमेल मध्ये पुढे असे म्हंटले आहे की आम्ही तुमच्या लॅपटॉप आणि मोबाईलचा कॅमेरा काही वर्षांपासून हॅक केला आहे. तुमच्या स्क्रीन वर जे काही दिसतय ते आम्हाला दिसतय. तुम्ही तीन वर्षांपूर्वी काही अश्लील वेबसाईटवर गेला होतात त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. तसेच तुमच्या मोबाईल मध्ये असलेले सगळे फोन नंबर आणि तुमच्या संपर्कात असलेल्यांचे ईमेल आयडी आमच्याकडे आहेत. बर्‍या बोलाने पैसे पाठवा नाही तर आम्ही ते रेकॉर्डिंग सगळ्यांना पाठवू.

त्या प्रतिष्ठित व्यक्तिसाठी हे धक्कादायक होतं. मी त्यांना सांगितले तुम्ही काहीही करू नका. पुढील दोन दिवसात मला अश्या अनेक लोकांकडून गोपनीय फोन आले. ईमेल पाठवणाऱ्याला कुठूनतरी अनेक लोकांचा डेटा मिळाला असावा. ईमेल आयडी पासवर्ड आणि फोन नंबर. एवढच त्याला मिळालं असावं. त्याने सरसकट सगळयांना हे पैसे उकळायचे ईमेल टाकले काही लोक घाबरले असतील काहींनी गुपचूप पैसे ही पाठविले असतील. ज्यांनी कधी काही चुकीचे काम केले असेल ते हा ईमेल वाचून घाबरले असणार. मला अश्याच सगळ्या प्रतिष्ठित लोकांचे कॉल येत होते.

कित्येक लोकं अश्या धमक्यांना बळी पडतात. आज आपली माहिती किती सर्रास उपलब्ध आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

तुमच नाव सापडलं तर तुमची पूर्ण माहिती इंटरनेट वर सापडू शकते. ही तुमच्याबद्दलची माहिती कोण टाकतो इंटरनेट वर? स्वतःचं नाव आणि गाव गूगल सर्च वर टाकून बघा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही ज्या गोपनीयतेसाठी ओरडता आहात ती तुम्हीच भंग केली आहे. फेसबुक-इनस्टा वर क्षणा क्षणाची माहिती टाकणारे सर्व वयोगटातले लोक बघायला मिळतात. 

बंगलोर मध्ये एका मोठ्या कंपनी मध्ये काम करणार्‍या विजय (नाव बदलले आहे) नवाच्या तरुणाला त्याच्या नागपूरच्या मित्राचा संध्याकाळी फोन आला. "काका पोहोचले का सुखरूप?" 

कोण काका? कुणाचे काका? कुठे पोहोचले? आणि तू मला का विचारतोय? मित्राला लक्षात आले त्याला कोणी तरी फसवले आहे. विजयच्या मित्राला त्या दिवशी एक फोन आला. फोन वर विजयचे वडील होते. नागपूर ते नाशिक प्रवास करत असताना मध्येच त्यांचे सामान चोरीला गेले होते. खिश्यात फक्त विजयने दिलेला फोन होता. काकांनी फोन मध्ये असलेल्या मित्राला फोन फिरवला व एका खात्यात पैसे टाकायला विनंती केली. मित्राने पटकन काकांची मदत केली. ओळख पटवून देण्यासाठी काकांनी त्या मित्राला विजय बरोबरच्या त्याच्या कॉलेजच्या बर्‍याच क्षणांची आठवण करून दिली. 

पण आता विजय म्हणतोय की त्याचे वडील तर त्याच्या बरोबर बंगलोरला आहेत. त्यांनी नाही फोन केला. 

मग हा व्यक्ति कोण होता ज्याला त्यांच्याबद्दल एवढी जवळची माहिती होती?

मित्राने फेसबुक उघडून बघितले आणि त्याच्या लक्षात आले की कोणीतरी विजय आणि त्याचे फेसबुक वरील कॉलेजचे सगळे फोटो बघून हा कट रचला असेल. 

आपण इंटरनेट वर आपली माहिती टाकणे चुकीचे नाही. तुम्ही खुशाल तुमचे फोटो रोज फेसबुक-इनस्टा वर टाका पण लोकांना ही माहिती सहज उपलब्ध आहे हे विसरू नका. त्याचा वापर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना फसवण्यसाठी होऊ शकतो हे लक्षात घ्या. 

आपण इंटरनेट वर जे काही करतो त्याचे लॉग तयार होत असतात. आपण इंटरनेट वर केलेल्या प्रत्येक कृतीची कुठे तरी नोंद होत असते. याला आपले डिजिटल फुटप्रिंट किंवा डिजिटल पाऊलखुणा म्हणतात. या डिजिटल पाऊलखुणा कधीही मिटत नाहीत. अनेक वर्षांनंतर ही आपण एकेकाळी इंटरनेट वर काय करायचो ते शोधल जाऊ शकतं. नोकर्‍या देतांना व्यक्तिचा भूतकाळ शोधणे आता सोपे झाले आहे. तुमचे मित्र कोण आहेत, तुम्ही कोणत्या ग्रुप मध्ये आहात, तुम्ही कसे संवाद साधता हे सगळ इंटरनेट वर सापडत आता. 

इंटरनेट वर गोपनीयता ही अंधश्रद्धा आहे असे मी नेहमी सांगतो. फेसबुक गूगल सॅमसंग अॅपल मायक्रोसॉफ्ट सगळे तुमची माहिती गोळा करत आहेत. 

व्हॉटसॅप वर केलेल चॅटिंग जरी एंड टू एंड एनक्रीपशन ने सुरक्षित केल असेल तरीही कोण कोणाशी चाट कोणत्या वेळी करत आहे ही माहिती ही महत्त्वाची आहे. 

एक विवाहित पुरुष शेजारच्या घरातल्या स्त्रीशी रोज रात्री तीन वाजता चॅटिंग करतो आणि नंतर सगळे चॅट डिलीट करतो ही माहिती तुम्हाला जर गोपनीय वाटत नसेल तर आश्चर्य आहे. त्यासाठी ते काय चॅट करतात हे कळणे आवश्यक आहे का? एंड टू एंड एनक्रीपशन ने ते सुरक्षित आहेत? त्यांच्या या डिजिटल पाऊलखुणा नेहमीसाठी इंटरनेट वर राहणार आहेत. ही माहिती कदाचित काही वर्षांनी नौकरी देणार्‍या कंपनी किंवा विमा देणार्‍या कंपनी विकत घेऊ शकतात. 

"जर तुम्ही एखादी सेवा फुकट वापरत आहात तर तुम्ही त्या व्यवसायाचे प्रॉडक्ट आहात." आश्चर्य वाटून घेऊ नका. फुकट फेसबुक आणि गूगल वापरताना आपण आपली गोपनीय माहिती त्यांना देतो जी ते जाहिरातदारांना विकतात. सोशल मीडिया वर राहून गोपनीयता ठेवता येणे ही एक भ्रामक कल्पना आहे. फेसबुक मानसशास्त्राची सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आहे असं माझं ठाम मत आहे. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर जपून करावा. कुठले ही चुकीचे कृत्य इंटरनेट वर करू नका. अन्यथा आपण स्वतः विरुद्ध अदृश्य पुरावे निर्माण करून डिजिटल पाऊलखुणा मागे सोडाल. 

CPAG

Popular Posts