हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

आगीत पुरावे जळतात तेव्हा!

By- Paresh Chitnis

२०१५ साली जर्मनीमध्ये एक महिला सार्वजनिक बागेतील बाकावर बसली असताना अचानक तिच्या शरीराने पेट घेतला. आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी वर्णन करताना सांगितले की ती महिला सहजपणे नुसती तिथे बसली होती. आणि तिच्या भोवती कोणतीही जळणारी वस्तू नसताना देखील तिच्या शरीराला आग लागली. जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जॅकेटने आग विझवली पण ती महिला वाचू शकली नाही. 

  डिसेंबर २०१० मध्ये आयर्लंड येथे घडलेल्या एका चमत्कारिक घटनेने पोलिसांना बुचकळ्यात टाकले. ७६ वर्षाचा मायकेल फॅहेरटी स्वतःच्या घरात फायर प्लेस जवळ जळालेल्या अवस्थेत सापडला. परंतु त्याचे शरीर, खालील जमिनीचा तेवढा भाग आणि बरोबर त्याच्या डोक्यावरील छताचा भाग सोडला तर इतर कुठेही जळल्याच्या अजिबात खुणा नव्हत्या. ह्या चमत्कारिक घटनांना स्पॉण्टेनियस ह्युमन कंबशन किंवा उत्फुर्त मानवी दहन असे म्हटले गेले आहे. अश्या सारख्या साधारण २०० घटना आजपर्यंत जगभरात नोंदवल्या गेल्या आहेत.      

  आग ही आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप उपयुक्त असली तरी गुन्हे तपासणीमध्ये  ती त्रासदायक ठरते. कारण आग लागली की खूप महत्वाचे पुरावे जळून राख होतात. त्यामुळेच बरेचदा गुन्हेगार जाणूनबुजून घटनास्थळाला आग लावून जातात. अश्यावेळी आर्सन एक्स्पर्टला (जाळपोळ विश्लेषण तज्ञाला) पाचारण केले जाते. त्याचे काम आगीशी संबंधीत प्रश्नांची उत्तरे शोधणे हे असते. 'आग कुठून सुरु झाली?, आग लागण्याचे मुख्य कारण कोणते होते?, आग नैसर्गिकपणे लागली की मुद्दाम लावली गेली?' आग सुरु होण्यासाठी तीन मूलभूत घटकांची गरज असते. "ऑक्सिजन, इंधन, उष्णता". ह्या तीनपैकी एक जरी घटक बाजूला काढला तर आग पेटू शकत नाही. गुन्ह्यांमध्ये मुद्दामहून लावल्या जाणाऱ्या आगीमागे स्पष्ट उद्देश असतात.

  १. आपल्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे- आग  ही सर्वभक्षी असते. त्यामुळे जवळपास सर्व लहान-मोठे पुरावे आगीत नष्ट होतात व गुन्हेगारापर्यंत पोचणे अशक्यप्राय होऊन बसते.

  २. विमा फसवणूक प्रकरणे-  झटपट पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणून विमा फसवणुलीकडे लोक बघतात. कर्जबाजारी झालेल्या कंपन्या, अथवा पैश्याच्या लोभापायी लोक मोठमोठ्या रकमांचे विमा उतरवून घेतात आणि मग स्वतःच कारखाने वा घराला आग लावून तिथे अस्तित्वातच नसलेल्या सामानावर दावे लावतात.

 ३. सूड घेणे- एखाद्या माणसाबद्दल मनात असलेल्या प्रचंड सुडाच्या भावनेला वाट करून देण्यासाठीही त्या व्यक्तीच्या घराला आग लावण्याचे प्रकार खूप कॉमन आहेत.

 ४. खून वा आत्महत्या- मोठ्या  प्रमाणावर नसले तरी जाळून खून करणे वा आत्महत्येसाठी जाळून घेणे हे प्रकार घडतात. जास्त करून कौटुंबिक त्रास भोगणाऱ्या महिलांबाबतीत  हा प्रकार बऱ्याचदा घडतो.

 ५. मानसिक कारणे- काही मनोरुग्णांना आगीचे आकर्षण असते. असे लोक केवळ विकृत आनंद मिळवण्यासाठी ठिकठिकाणी आगी लावतात.

 ६. आतंकवादी कारवाया - सध्याच्या काळात आतंकवादी गट समाजात भीती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी आगी लावणे वा बॉम्ब स्फोट घडवून आणणे अश्या मार्गांचा सर्रास अवलंब करतात.

 जाळपोळींच्या प्रकरणांंमध्ये तपासकार्य खूप अवघड असते कारण अश्या ठिकाणी आग विझल्यानंतर सुद्धा धूर, स्फोट, छताचे जळालेले भाग कोसळणे ह्या गोष्टी होऊन तपास करणाऱ्यांना धोका असू शकतो. तसेच आग विझवताना फवारलेल्या गेलेल्या पाण्यामुळे अनेक पुरावे नष्ट झालेले असतात. आगीच्या घटनांमध्ये प्रत्यक्ष साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरतात. त्यांच्या कडून एखादा महत्त्वाचा दुवा मिळू शकतो जसे कि सर्वात आधी आग अथवा धूर कुठल्या ठिकाणी दिसला?, आगीचा व धुराचा रंग काय होता?, त्या ठिकाणाहून कोणी संशयास्पद व्यक्ती जाताना दिसली का?

 आगीच्या रंगावरून आग लावण्यासाठी काय वापरले गेले आहे ह्याचा अंदाज बांधता येतो. उदाहरणार्थ रॉकेल वापरून लावलेल्या आगीचा रंग पिवळा व धुराचा रंग पांढरा दिसतो. आगीचा केंद्रबिंदू शोधण्यासाठी आग कशी पसरते ह्याचे ज्ञान असणे गरजेचे असते. आग साधारणतः केंद्रापासून बाहेरच्या बाजूला आणि वर पसरत जाते पण इमारतीच्या डिसाईन वरही ते अवलंबून असते. तिथे जिना असेल तर आग त्या दिशेने पसरते. जमिनीवर जर कार्पेट असेल तर आग कार्पेट असलेल्या भागावर अधिक पसरत जाते. लाकडी वस्तू असलेला भाग लवकर पेट घेतो. ज्या ठिकाणी खेळती हवा आहे अश्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा होत राहिल्याने आग जास्त भडकते व बंद खोलीत ती पटकन विझू शकते.   

           आग नैसर्गिक आहे, अपघाती आहे वा मुद्दाम लावली गेली आहे हे आगीचा केंद्रबिंदू व आग लागण्यात समाविष्ठ घटक यावरून निश्चित करता येते. पावसात वीजा कोसळणे, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाळलेली पाने वा झाडे असणे अश्या वेळी नैसर्गिकरित्या आग लागू शकते. अपघाती आग ही दुर्लक्षित वायरिंग, अर्धवट जळालेल्या सिगारेट्स या गोष्टींनी लागू शकते. परंतु जर एखाद्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थाबरोबर जळालेली काडी अथवा मेणबत्ती किंवा मुद्दाम कापलेली इलेक्ट्रिक वायरिंग्स तसेच रॉकेल वा पेट्रोलचे कॅन अश्या गोष्टी सापडल्या तर तिथे हेतुपुरःसर आग लावली गेली आहे असा निष्कर्ष निघतो.

           मानवी शरीर पूर्णपणे जाळण्यासाठी स्मशानात लाकडं रचून ८०० अंश सेल्सिअसचे  तपमान किमान दोन तास निर्माण केले जाते तेव्हा कुठे मृत शरीर पूर्ण जळते. गुन्हेगार खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी जर घराला आग लावून मृत शरीर जळून नष्ट होईल अशी अपेक्षा करत असेल तर तो फसतो. अश्या लावलेल्या आगीत तपमान जरी ११०० अंश सेल्सिअस पर्यंत पोहचत असले तरी इंधन व प्राणवायूचा पुरवठा संपल्याने मृत शरीराजवळ आग जास्त वेळ टिकत नाही. अश्या परिस्थितीही शवविच्छेदन शक्य असते. मृत्यूचे कारण समजू शकते. फुप्फुसात धूर असल्यास गुदमरून मेल्याची शक्यता असते. लघवी मध्ये निकोटीनचे प्रमाण खूप जास्त असल्यास मृत व्यक्ति सिगारेट पिणारा होता हे म्हणता येते मात्र तसे नसल्यास ईतर कोणीतरी सिगारेटने आग पेटवली असू शकते. कार्बन मोनोक्साईडजर रक्तात जास्त प्रमाणात असेल फुप्फुसात धुराची काजळी असेल तर मृत व्यक्ति आग लागली तेव्हा जिवंत होती असे म्हणु शकतो अन्यथा कट करस्तानाच्या शंकेला जागा राहते. 

CPAG

Popular Posts