हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

डिजिटल पाऊलखुणा 1

By- Paresh Chitnis

डिजिटल फूटप्रिंट म्हणजे इंटरनेट व संगणकीय स्वरूपात आपण केलेल्या कृत्यंच्या पाऊलखुणा. आपण मोबाईल, संगणक आणि कुठल्याही संगणकीय यंत्राचा वापर जेव्हा करतो तेव्हा नकळत आपल्या पाऊलखुणा मागे सोडत जातो.

समुद्रकिनारी वाळूत तयार झालेल्या पाऊलखुणा पुढच्या लाटेने लगेच पुसल्या जातात मात्र डिजिटल स्वरूपातील आपल्या पाऊलखुणा अनंत काळासाठी संकलित होऊन साठविल्या जाऊ शकतात.

आपण सोशल मीडियावर जे काही लिहितो पोस्ट करतो किंवा शेअर करतो ते कधी ही पुसले जाऊ शकत नाही.

ही सर्व माहिती आपल्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरली जाऊ शकते.

आपण इंटरनेट वर शेअर करून डिलीट केलेली माहिती खरच डिलीट होते का? याचे थक्क करणारे उत्तर 'नाही' असे आहे.

आपण इंटरनेट वर काहीतर कृत्य खूप वर्षांपूर्वी केलेले असेल तर त्याचे डिजिटल फूटप्रिंट आज आपल्या आयुष्यात धुमाकूळ घालू शकतात. डिजिटल फूटप्रिंटमुळे आयुष्य उध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत.  अॅश्ले मेडिसन नावाची एक वेबसाईट आहे. ही अमेरिकेची प्रसिद्ध डेटिंग वेबसाईट आहे. त्यांचे ब्रीदवाक्य आहे ' आयुष्य छोट आहे, विवाहबाह्य संबंध करा' अनेक विवाहित अविवाहित स्त्री व पुरुषांनी या संकेत स्थळावर आपले अकाऊंट तयार केले व अनोळखी लोकांशी मैत्री केली. या संकेत स्थळावर अकाऊंट तयार करणे स्त्रियांना मोफत आहे व पुरुषांना पैसे भरावे लागतात. क्रेडिट कार्डने पैसे भरल्यामुळे सर्वांची अचूक माहिती वेबसाईट वर सेव झाली. बरीच लोक इतरांचे ईमेल आयडी टाकून या संकेत स्थळावर आपल्या शत्रूंचे अकाऊंट बनवत असत. तुमचा ईमेल आयडी असलेला अकाऊंट या वेबसाईट वर कोणी बनवला आणि तो तुम्हाला डिलीट करायचा असेल तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील. पैसे भरल्यावर तुमची माहिती डिलीट केली जाईल असे सांगितले जात होते. अशी परिस्थिती असताना अचानक १८ जुलै २०१५ रोजी काही हॅकर्सनी या संकेत स्थळावरील बर्‍याच लोकांची माहिती उघड केली. 

यात अनेक उच्च पदस्थ व्यक्तींची नावे उघड झाली. अमेरिकेतील सैन्यातील पदाधिकाऱ्यांची, अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांची, राजकारण्यांची नावे उघड झाली. सौदी अरेबिया मध्ये विवाह बाह्य संबंध ठेवल्यास मृत्युदंडाची शिक्षा आहे. अनेक सौदी अरेबिया च्या नागरिकांची नावे उघड झाली. संसार उध्वस्त झाले, घटस्फोट झाले, हेवेदावे झाले, अब्रूदार लोक बेअब्रू झाले. 

डिजिटल फूटप्रिंट्स कसे आणि कधी आपल्या आयुष्यात येऊन धुमाकूळ घालतील याचा विचार आपण करू शकत नाही. त्यामुळे इंटरनेट वर आपण काय करतो आहोत याचे भान नेहमीच बाळगणे आवश्यक आहे. 

काही सायबर क्रिमिनल्स डिजिटल फूटप्रिंटची भीती दाखवून पैसे उकळायला पाहतात. तुमचा ईमेल आयडी व पासवर्ड ही माहिती जर कुणाला मिळाली तर ते तुमचा ईमेल उघडून वापरू शकतात. पण काही सायबर गुन्हेगार त्यात कल्पकता वापरून पैसे उकळायला पाहतात. 

'तुमचा हा ईमेल व हा पासवर्ड आहे. तुम्ही कुठल्याश्या अश्लील संकेतस्थळावर गेला होतात तेव्हा मी तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने तुमचे फोटो काढले व त्या वेबसाईटचेही फोटो काढले आहेत. तुमच्या संपर्कात असलेल्या सर्वांचे ईमेल आयडी मी मिळवले आहेत व पैसे न दिल्यास त्या सगळ्यांना मी तुमचे फोटो पाठवीन.' अश्या आशयाचे ईमेल पाहिल्यावर व आपला ईमेल चा पासवर्ड पाहिल्यावर बरीच मंडळी आपण इंटरनेट वर केलेल्या चुकीच्या कृत्याच्या उघड होण्याच्या भीतीने पैसे पाठवतात. या बद्दल कुठेही वाच्यता करत नाही की पोलिसांकडे तक्रार करत नाही. सायबर गुन्हेगार तुमच्या डिजिटल फूट प्रिंट्सची नुसती आठवण करून देतात आणि तुम्ही घाबरून जातात. 

डिजिटल फूट प्रिंट दोन प्रकारच्या असतात. आपण शेअर केलेली माहिती जसे फोटो, विडीओ , चॅट इत्यादी हे आपले डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष डिजिटल फूट प्रिंट आहेत. अप्रत्यक्ष रित्या आपले डिजिटल फूटप्रिंट तयार होत असतात. तुम्ही एटीएम मशीनचा वापर केला, परदेशातून एखादे फेसबुक सारखे संकेतस्थळ वापरले तर तुमच्या ठाव ठिकाणाचे पुरावे आपोआप निर्माण होतात. लॉगीन केल्याचे डिटेल्स हे पण आपोआप निर्माण होतात. ईमेल पाठवल्यावर ईमेल कोणत्या संगणकावरून किंवा मोबाईल मधून पाठविले कोणत्या देशातून पाठविले, कोणत्या इंटरनेट सर्विस चा वापर केला ही सगळी माहिती ईमेल हेडर या स्वरूपात उपलब्ध असते. 

एका भारतीय विद्यार्थ्याने परदेशात शिक्षणासाठी जाताना बँकेकडून कर्ज घेतले मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर कर्ज न फेडता तो भूमिगत झाला होता. आई वडिलांना बँक पाठपुरावा करू लागली. मुलाचा काहीच पत्ता नाही. तो कधीतरी घरी फोन करत असे पण फोन नंबर ट्रॅक होत नव्हता. त्याने घरच्यांना एक ईमेल केली होती. त्या ईमेल चा हेडर अभ्यासला असता असे लक्षात आले की तो भारतात आहे. त्याने पाठविलेली ईमेल बंगलोर मधून आली होती. 

काही दिवसातच त्याचा शोध लागला. 

स्मार्ट यंत्र व इंटरनेट ऑफ थिंग्सच्या लाटेवर स्वार झालेलो आपण असंख्य डिजिटल पाऊलखुणा निर्माण करतो आहोत. आपण इंटरनेट वर जे काही करतोय त्याचे अदृश्य पुरावे निर्माण होतात याचे भान ठेवून सर्वांनी इंटरनेट व तंत्रज्ञानाचा वापर करावा. इंटरनेट वर कुणाला त्रास देणे, धमकावणे, अश्लील चॅट करणे, खोटे अकाऊंट बनवणे, फसवणे या सगळ्याचे पुरावे गुन्हेगार तयार करत असतो. अदृश्य पुरावे शोधून न्याय मिळवून देण्यासाठी सायबर पोलिस यंत्रणा सक्षम आहेत. 

 

CPAG

Popular Posts