हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

ये लाल रंग

By- Paresh Chitnis

अनेक स्त्रियांचे खून करून, लाल श्याहीने लिहिलेले कोळ्याच्या जाळ्या सारखे दिसणार्‍या अक्षरात पत्र मागे सोडून जाणारा हा विक्षिप्त खुनी या वेळी चुकला होता. एरवी कुठले ही पुरावे मागे सोडून न जाणारा हा हुशार खुनी आपल्या बोटांचे ठसे बाटली वर सोडून गेला होता. त्याने वोडकाच्या बाटलीने त्याच्या सावजाच्या डोक्यावर वार केला होता.
या क्रूरकर्म्याने आतापर्यंत कित्येक तरुणींचे खून केले होते. मात्र हे खून एका विशिष्ट परिसरात होत नव्हते. पोलंड मधील अंतरावर असलेल्या शहरांमध्ये हे खून तीन वर्ष होत होते. सर्व खून एकसारख्या पद्धतीने केलेले होते. बलात्कार करून पोटापासून पायांपर्यंत धारदार शस्त्राने अनेक वार केलेले असत. तरुण गोर्‍या वर्णाच्या मुलींना तो आपले लक्ष्य करत असे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तरुणीचे शव पाहून लोकांचे डोके सुन्न होऊन जात असे. अतिशय क्रूर पद्धतीने खून करणारा हा व्यक्ति मनोरुग्ण असावा अशी शक्यता होती.
या प्रकरणाचा तपास करणारे डिटेक्टिव मेजर सिझनेक  यांना एक लक्षात आले होते की हे खून जिथे जिथे झाले तिथे सगळीकडे रेल्वे स्टेशन जवळ होते. आणि हे सगळे रेल्वे स्टेशन दोन शहरांशी जोडलेले होते. म्हणजे खुनी या दोन शहरातला असावा. तो आपल्या घरापासून लांब जाऊन खून करतो आणि गायब होतो.
एकदा तर त्याने ट्रेनच्या आरक्षणाच्या डब्यात खून केला होता. ट्रेन नुकतीच सुरू झाली होती. याचा अर्थ आरोपी ट्रेन मध्येच होता. १९६६ सालचा क्रिसमसचा दिवस होता. सगळयांना ट्रेन मधून उतरून लवकर जाण्याची घाई होती अश्या वेळी प्रत्येकाची झडती घेऊन चौकशी करून ट्रेन पुढच्या स्टेशन वरुन सोडावी लागली. सगळे प्रयत्न करून ही तो सुटला होता. कुठला ही रक्ताचा डाग कपड्यांवर नाही कुठलेही शस्त्र सापडले नाही. मात्र लाल श्याहीने लिहिलेले कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसणार्‍या अक्षरात लिहिलेले पत्र मात्र तेव्हाही सापडले होते. "मी पुन्हा हे केलं" एवढाच मजकूर त्यात होता. म्हणजे हा कोणी तिचा परिचित नसून मनोरुग्ण खुनी होता.
हस्ताक्षरावरून व्यक्तिचा स्वभाव समजतो. तसा अभ्यास तपास करणार्‍या डिटेक्टिव मेजर सिझनेक यांनी केला. लिहिणाऱ्या व्यक्तिच्या मनात खूप राग आहे हे दिसून येत होते. त्याचे हस्ताक्षर धूर्तपणा व बदला घेण्याची भावना दर्शवत होते. कागदपत्रांचा अभ्यास करताना कागदाचा, शाईचा, हस्ताक्षराचा व त्यातील मजकुराचा अभ्यास केला जातो. तसेच कागदावर बोटांचे ठसे किंवा इतर काही अदृश्य पुरावे आहेत का याचा ही तपास केला जातो. वापरलेली शाई ही शाई आहे की रक्त हे तपासले गेले.
त्याकाळात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा ऊपयोग करून शाईचा अभ्यास केला गेला. थिन लेयर क्रोमॅटोग्राफी करून शाईचे घटक शोधण्यात आले. त्याने टरपेंटाईन व लाल कॅनव्हास वर वापरायचा रंग वापरला होता. हा व्यक्ति कलाकार असावा किंवा त्यासंबंधी काही तरी करणारा असावा.
त्याने एक चूक अजून केली होती. चुकून एकाच घरातील दोन मुलींचा त्याने काही महिन्यांच्या कालावधीत खून केला. त्या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. पालकांशी बोलताना लक्षात आले की त्या दोघी कारकाव शहरातील एका आर्ट लव्हर्स क्लबच्या सदस्यांसाठी मॉडेल म्हणुन काम करत होत्या.
डिटेक्टिव मेजर सिझनेक यांना मोठा दुवा हाती लागला असे वाटले. तो खुनी या आर्ट क्लबचा सभासद असावा. पण त्या क्लबचे शंभरहून अधिक पुरुष सभासद होते. मात्र नकाशावर सर्व खूनाच्या जागा मार्क केल्यावर या जागांना रेल्वेने जोडणाऱ्या दोन शहरांपैकी वारसाॅ या शहरातील एक व्यक्ति जो त्या आर्ट क्लबचा सभासद होता त्यावर संशय आला. लुसियन स्टॅनिक नावाचा हा तरुण वारसाॅ येथे राहत होता. अजून शोध घेतला असता असे लक्षात आले की त्याच्याकडे देशभर कुठेही प्रवास करण्याचा रेल्वे चा पास होता. काही खूनाची स्थाने तर त्याच्या शहरापासून दीडशे किलोमीटर अंतरावर होती. त्याच्या लॉकरची झडती घेतली असता त्यात भरपूर लाल रंग सापडला. चित्रकलेत लागणारे चाकू तसेच एक पेंटिंग सापडले. त्याचा अर्थ लावण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली गेली. हे चित्र विचित्र होते असे म्हणायला हरकत नाही.
एक गाय फूल खातेय. त्या गायीला लांडगा चावतोय. लांडग्याला शिकारी मारतोय. त्या शिकाऱ्याला एक बाई चारचाकी गाडीने उडवते आहे. व त्या बाईला एक क्रूर खुनी रक्त बंबाळ करून मारतो आहे. व तिच्या नग्न शरीरावर एक कोमेजलेले फूल पडले आहे. चित्राचे नाव ' सर्कल ऑफ लाइफ' असे होते. पुढे त्याचे हस्ताक्षराचे नमुने मिळवून ते पडताळण्यात आले.
लुसियन स्टॅनिकचा पूर्ण परिवार एका कार अपघातात गेला होता. त्या अपघातातील आरोपीची निर्दोष सुटका झाली होती. आरोपी एक स्त्री होती.
लुसियन स्टॅनिकला चौकशीसाठी बोलावल्यावर काही वेळातच त्याने विचारलेल्या चार खूनांची कबुली दिली व आतापर्यंत वीस खून केल्याचे सांगितले. आपण त्या आरोपी चा खून करणार होतो मात्र संशय होईल म्हणुन तिच्यासारख्या दिसणार्‍या महिलांना मारणे सुरू केले. खून केला की राग ओसरत असे. मग पुन्हा राहून राहून राग आला की तो आणखी एक खून करत असे. मग मुलींना भुरळ घालून बलात्कार करण्याची चटक लागली. शेवटचा खून खूप काळानंतर त्याने केला होता. वर्तमानपत्रात बरेच दिवसात आपण केलेल्या खुनाची चर्चा नाही म्हणुन तो अस्वस्थ झाला होता त्यामुळे त्याने एक खून अजून केला असे त्याने सांगितले.
राग, सूड, पाशवी वृत्ती व शेवटी प्रसिद्धी यासाठी त्याने अनेक खून केले.
लुसियन स्टॅनिक हा मनोरुग्ण आहे हे सिद्ध करून त्याचा मृत्युदंड जन्मठेपेत बदलून घेण्यात त्याचे वकील यशस्वी झाले. यात एकच आधार वापरला गेला आणि ते म्हणजे त्याने काढलेल्या चित्रांचा मानसशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास व विश्लेषण. त्यांच्या विश्लेषणाच्या अनुसार तो रुग्ण होता व खून करताना तो रागाच्या भरात असायचा. हस्ताक्षर विश्लेषण, चित्र विश्लेषण व स्वभाव यांचा अभ्यास या प्रकरणात खूप कामी आला.
त्याने साठच्या दशकात पोलंड मध्ये दहशत माजवली होती.
मिडियाने त्याला 'रेड स्पायडर' हे नाव दिले होते कारण तो लाल रंगात कोळ्याच्या जाळ्यासारखे हस्ताक्षर काढत असे आणि त्याच्या जाळ्यात मुलींना पकडून रक्ताच्या लाल थारोळ्यात त्यांना सोडत असे.
 

CPAG

Popular Posts