हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

मूर्ती लहान, कृती भयाण

By- Paresh Chitnis

"आय डोन्ट लाईक मंडे" हे गाणं ब्रीटन मध्ये एके काळी गाजलेलंं गाणं आहे. रविवारी रात्री प्यायलेल्या दारूचा हँगओव्हर सोमवारी सकाळी येतो म्हणुन मला सोमवार आवडत नाही असा अर्थ समजून ते गाणं लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. पण हे गाजलेलं गाणं लिहिण्याची प्रेरणा बॉब गेलडॉफला मिळाली कुठून ते फार कमी लोकांना माहिती आहे.
२९ जानेवारी १९७९ सोमवार सकाळची वेळ होती सॅन डीएगो मध्ये एका शाळे समोर शाळेचे गेट उघडायची वाट बघत काही विद्यार्थी थांबले आहेत. शाळेचे कर्मचारी ही तिथे आहेत. मुख्याध्यापक येण्याची वेळ झालेली असतानाच, समोरच्या घराच्या खिडकीतून कोणी तरी .२२ रायफलने गोळीबार सुरू केला. एक गोरी उंच लाल केस असलेली मुलगी हातात बंदूक घेऊन बेछूट गोळीबार करत होती. वीस मिनिटांच्या या थरारनाट्यामध्ये नऊ विद्यार्थी व ईतर लोक जखमी झाले. मुख्याध्यापक व एक कर्मचारी जागीच ठार झाले.
जगातली ही शाळेतली पहिली शूटिंग केस होती. ब्रांडा स्पेन्सर नावाची ही मुलगी सोळा वर्षे वयाची होती. ती तिच्या वडिलांबरोबर एका घरात अत्यंत हालाखीचे जीवन जगत होती. गोळीबार करून झाल्यावर पोलिस तिला अटक करणार त्याआधी एका पत्रकाराने तिला तिच्या घरी फोन करून गोळीबार करण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की "मला सोमवार आवडत नाही, सोमवार जगण्याची उमेद प्रबळ करतो". या वाक्यावरून बॉब गेलडॉफला ते गाणं सुचलं.
सोळा वर्षाच्या मुलीने तेव्हा हे भीषण कृत्य केले होते. ब्रांडा स्पेन्सर अजून ही जेल मध्ये आहे. नुकतेच तिने तुरुंगवासाची चाळीस वर्षे पूर्ण केली आहेत. मानसिक आजार, दारिद्र्य व नैराश्य या मुळे तिने हे केले होते.  लहान वयात क्रूर गुन्हे करणारे बाल गुन्हेगार हे कुठल्यातरी मानसिक तणावाखाली असतात. 


२०१४ मध्ये मॉर्गन गिझर व अनिसा वेइयर या दोन बारा वर्षाच्या मैत्रिणींनी एका महिलेला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने जंगलात नेले व तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. १९ वेळा तिच्या शरीरावर वार केले होते. ती महिला त्यातून बचावली. या दोघींनी हा खूनाचा प्रयत्न कुठल्यातरी विडिओ गेमच्या प्रभावाखाली केला होता.
१९९३ मध्ये जॉन वेनेबल्स व रॉबर्ट थाँपसन या दोन दहा वर्षाच्या मुलांनी नाट्यमयरित्या एका दोन वर्षाच्या मुलाला शॉपिंग मॉल मधून किडनॅप करून त्याचा छळ करुन दोन दिवसांनंतर त्याला रेल्वे लाइन वर सोडून दिले होते.
आलिशा नावाच्या एका पंधरा वर्षांच्या मुलीने एका नऊ वर्षाच्या मुलीची हत्या करून तिला जंगलात नेऊन पुरले. तिने आपल्या डायरी मध्ये या घटनेचा अनुभव लिहिताना त्याला एक आश्चर्यकारक आणि मनोरंजक अनुभव असा उल्लेख केला होता. गेली दहा वर्षे ती तुरुंगात आहे. तिला पुढील ३५ वर्षे पॅरोल नाकारण्यात आला आहे.
भारतात गुरगाव येथे रायन इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रद्यूम्न ठाकूर या दुसरीतल्या विद्यार्थ्याचा गळा चिरून खून करण्यात आला होता. अतिशय नाट्यमय घडामोडींनंतर इयत्ता अकरावीचा एक विद्यार्थी सापडला ज्याने हा खून केला होता. पालकांची मीटिंग व परीक्षा पुढे ढकलली जावी म्हणुन त्याने असे केले असे त्याने सांगितले. मृत्यु घडवून आणण्यासाठी विविध विषाचा त्याने अभ्यास त्या पुर्वी केला होता. शास्त्रावरचे बोटांचे ठसे कसे मिटवले जातात याची माहिती ही त्याने शोधून काढली होती.
शालेय पद्धतीचा किती मानसिक ताण त्या मुलाच्या मनावर असेल आणि अशे उपाय त्याला का सुचले असतील हा अभ्यासाचा विषय आहे.
या सर्व केसेस मध्ये गुन्हेगारांना प्रौढ म्हणुन न्यायालयात हजर केले गेले आहे. अश्या क्रूर प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वय बघितले नाही जात. बाल गुन्हेगार एकवीस वर्षांंचा होईपर्यंत सुधारलायात ठेवतात. त्यानंतर तो न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगतो. जुवेनाईल जस्टीस अॅक्ट २०१५ हा भारतीय कायदा या साठी मार्गदर्शक ठरतो.
बाल गुन्हेगारी ही वाढताना दिसते आहे. पालक आणि शाळा यांना या विरुद्ध ठोस उपाय करणे अवश्यक झाले आहे. 

 

छायाचित्र: सोळा वर्षीय ब्रांडा स्पेन्सर हिला अटक होताना 


 

CPAG

Popular Posts